जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संतापाची लाट; ठिकठिकाणी निदर्शने

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संतापाची लाट; ठिकठिकाणी निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी केलेल्या आपल्या एका वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केला.

ठाणे/मुंबई : राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद गुरुवारी राज्यभर उमटले. ठिकठिकाणी आव्हाड यांच्या प्रतिमेला काळे फासून निदर्शने करण्यात आली. ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर बुधवारी रात्री अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी महाआरती करत निषेध केला. कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम यांचा हातात फोटो घेऊन आंदोलन केले.

“राम हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते. ते १४ वर्ष वनवासात होते तर ते शाकाहारी कसे असू शकतात,” असे वक्तव्य करून आव्हाड यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यानंतर ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात येत्या २४ तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास वर्तकनगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. घाटकोपरमध्ये भाजपचे आमदार राम कदम यांनी रस्त्यावर उतरून आव्हाड यांच्याविरोधात निदर्शने केली.

“जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात हिरवा साप आणि दुतोंडी साप म्हणतात. ते रात्रीचे ट्विट करतात सकाळी डिलीट करतात. रात्री त्यांची अवस्था काय असते हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा,” अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. “खुर्चीसाठी मातोश्रीने हिंदुत्व सोडलेले आहे. आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत शिवसेनेने आपली भूमिका मांडावी,” असे आवाहनदेखील म्हस्के यांनी केले.

मी ओघात बोललो -आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी केलेल्या आपल्या एका वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केला. “मी श्रीरामांविषयी ओघात बोललो. माझे विधान अभ्यासपूर्ण होते. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात, पण आमचा राम आमच्या मनातच आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही,” असे आव्हाड म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in