पु.ल.देशपांडे कला अकादमीत स्त्री शक्तीचा लोकजागर

पु.ल.देशपांडे कला अकादमीत रंगतोय “मी आनंदयात्री” महिला कला महोत्सव २०२३
पु.ल.देशपांडे कला अकादमीत स्त्री शक्तीचा लोकजागर

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन आणि संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांच्या वतीने लोककला क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यात आदिवासी महिला ताई धिड्या, लावणी कलावती सिने अभिनेत्री राजश्री नगरकर, महिला शाहिर कल्पना माळी, लोककलावंत सरला नांदुरेकर, भजनसम्राज्नी गोदावरी मुंडे, भारुड सम्राज्नी चंदाबाई तिवाडी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भावना गवळी, विद्या साठे, प्रगती भोईर, कुंदाताई पाठक यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते गौरवमुर्तीना सन्मानित करण्यात आले.

शुक्रवार, १० मार्च रोजी दुपारी २ वाजता पुण्याच्या मुक्ता बाम आणि सहकाऱ्यांनी “यात्रा”- वारीचा प्रवास या कार्यक्रमाद्वारे पंढरीची वारी घडवली. त्यानंतर दादरच्या आचार्य अत्रे समितीने “अत्रे कट्टा” द्वारे महिलांशी संलग्न कायद्याची माहिती देत महिलांचे प्रबोधन केले. संध्याकाळी “व्हय! मी सावित्रीबाई” हा क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंवरील कार्यक्रम उज्वल मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. सायंकाळी ६ वाजता संपदा जोगळेकर- कुलकर्णी आणि हर्षदा बोरकर यांनी “स्त्री” कविता/ अभिवाचन/ कथा सादर केल्या. त्यानंतर “सॅलिटेशन डान्स अकॅडमी”च्या दीपिका आनंद आणि सहकारी यांनी कथ्थक या भारतीय नृत्यशैलीचे सादरीकरण केले. शेवटी ज्योती शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्री ८ वाजता “ओवी रंग”- ओव्या जात्यावरच्या, गप्पा नात्यावरच्या हा कार्यक्रम सादर करत नात्यांचे विविध पदर उलगडले.

गुरुवार, ९ मार्च पासून `मी आनंदयात्री' महिला कलामहोत्सव २०२३ या महोत्सवास प्रारंभ झाला. गुरुवारी “सौ.सुशीला पृथ्वीराज चव्हाण प्रतिष्ठान” भक्तीरंग शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम ही नृत्यकला लोअर परळच्या तेजस्विनी चव्हाण आचरेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केली. आव्हान पालक संघ -विशेष व्यक्तिंकरिता पालकांनी चालवलेली कार्यशाळा या शाळेच्या मुलांनी आपली कला सादर केली. सोलापूरचे स्वरश्री महिला भजनी मंडळाच्या सौ. सौ.मंगला अरुण बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध कलागुण दर्शन भजनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. “नाच गं घुमा” द्वारे पनवेलच्या सौ.सुनीता खरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अन्नपूर्णा स्तोत्र, जागर शक्तीचा, भारूड, टिपऱ्या ही कला सादर केली. डोंबिवलीचे “मी एकलव्य आर्ट फाऊंडेशन”चे समृद्धी चव्हाण, सुनीता पोद्दार यांनी ग्रुप परफॉर्मन्स सादर केला. गुरुवारची सांगता विलेपार्ले येथील रंगवेधचे कलाकार प्रस्तुत “तेथे कर माझे जुळती”कार्यक्रमाने झाली.

शनिवारी, ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता “पंचमी कला अकादमी” च्या वैशाली जोशी आपल्या सहकाऱ्यांसह महिला दिन स्पेशल कथ्थकने दिवसाची सुरुवात करतील. दुपारी २ वाजता “या जगण्यावर शतदा प्रेम करावे” द्वारे शुभा जोशी सहकाऱ्यांसह सकारात्मक व आनंददायी गाणी गातील. दुपारी ४ वाजता “पु.ल.देशपांडे कला अकादमी” आणि “लोकमत” यांच्या संयुक्त विद्यमाने व सखी मंचच्या वतीने “जल्लोष आरोग्याचा” हा कार्यक्रम सादर होणार आहे. डोबिवलीच्या श्वेता राजे सहकाऱ्यांसह “सूर निरागस” हा संत साहित्यावरील मराठी वाद्यवृंद सादर करतील. शनिवारी रात्री ८ वाजता घाटकोपरच्या विधी साळवी त्यांच्या बॅडसह फ्युजन ब्रँड ग्रुप द्वारे गोवा वसईची फ्युजन मधुर गाणी सादर करतील. सदर कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून महिला कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in