डॉ. प्रकाश खांडगे यांना पद्मश्री कृष्णराव साबळे पुरस्कार

यापूर्वी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. खांडगे यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार २०१९ मध्ये प्राप्त झाला होता.
डॉ. प्रकाश खांडगे यांना पद्मश्री कृष्णराव साबळे पुरस्कार
Published on

मुंबई : लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना डोंबिवली येथील यशराज ग्रुप या प्रसिद्ध सांस्कृतिक संस्थेतर्फे शाहीर कृष्णराव साबळे लोकगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते मधुकर चक्रदेव यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे संस्थेचे प्रमुख विवेक ताम्हणकर यांनी जाहीर केले.

गेली ४५ वर्षे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा, लोककलांचा मूलगामी अभ्यास करणारे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना त्यांच्या लोककलेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. खांडगे यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार २०१९ मध्ये प्राप्त झाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये भारत सरकारचा ‘पद्मभूषण डॉक्टर कोमल कोठारी पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, राज्य वाङ्मय पुरस्कार, शिवनेरी भूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल सभागृह, डोंबिवली पूर्व येथे रविवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचे मानबिंदू पद्मश्री शाहीर साबळे यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार त्यांचे परममित्र लोककलेचे जेष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना जाहीर झाल्याबद्दल आम्हा सर्व लोककलावंतांना अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in