मुंबई पोलिसांना मागील काही महिन्यांपासून अनेक अज्ञात व्यक्तींनी फोन करून भटकावण्याचा प्रयत्न केला आहे . कोठे कोणी तरी बॉम्ब ठेवला आहे. इथपासून तर मंत्रालय उडवून लावू इथपर्यंत, असे धमकी देणारे फोन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात आले आहेत. अशातच आता अनंत चतुर्दशीच्या आधी बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने फोन करून मुंबईत काही पाकिस्तानी मच्छीमार आले असल्याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,पाकिस्तानी मच्छीमार मुंबईत आले असून ते गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर याठिकाणी आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली. खबरदारी म्हणून पोलिसांनी देखील माहिती मिळताच तात्काळ तपास सुरु केला. गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. तसंच स्थानिक पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.
या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास केला असता ही माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर मुंबई शहरातील सर्व मोठ्या गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन असल्यामुळे मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आणि अशातच या खोट्या माहिती देणाऱ्या फोन मुळे पोलिसांना अजून कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.