मुंबई: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांत जागोजागी ‘हनीट्रॅप’ लावल्याची सनसनाटी गुप्त माहिती लष्करी गुप्तचर व विशेष विभागाने मल्टी एजन्सी सेंटरला दिली आहे. हनीट्रॅपमध्ये फसवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने बनावट कॉल व बनावट लिंक्सचा वापर केला जातो. संवेदनशील माहिती मिळवायला भारतीय लष्करी अधिकारी व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना ‘टार्गेट’ करण्याची पाकिस्तान गुप्तचर यंत्रणांनी जाळे पसरवले असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेची ही मोहीम एका डेटाबेसवर आधारित होती. हा डेटाबेस लक्ष्य करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या स्मार्टफोन्समधून घेण्यात आला होता. त्यांच्या फोनमध्ये घुसखोरी करून ही माहिती पळवण्यात आली. आयएसआयचे गुप्तचर अधिकारी या फोनमधून काढलेल्या डेटाचे विश्लेषण करून त्यांचे लक्ष्य अचूकपणे निवडत आहेत. ते विशेषतः भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा एजन्सींमधील ‘सॉफ्ट टार्गेट्स’ निवडत आहेत.
भारताच्या लष्करी गुप्तचर यंत्रणा व विशेष ब्युरोने पाकिस्तान गुप्तचर यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबत सांगितले की, ते डेटा आणि संवेदनशील माहिती काढण्यासाठी हनीट्रॅप ऑपरेशन वापरत आहेत. या हनीट्रॅपसाठी विशेष अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ करत आहेत.
लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बनावट कॉल हे धोकादायक असल्याचे अनेकदा आढळले आहे. आपल्या ‘टार्गेट’ला जाळ्यात ओढायला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा महिलांना संभाषण करायला लावते. मात्र, त्या प्रत्यक्षात ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा तो भाग असतो. ते मॉडेल, नवी अभिनेत्री अशी ओळख करून देत त्या मदतीची अपेक्षा करतात. तसेच त्या शारीरिक संबंधाबाबत चर्चा करतात. हे करताना संबंधित अधिकाऱ्याच्या फोनमधील डेटा चोरला जातो.
भारतीय लष्करात व अन्य गुप्तचर यंत्रणांमध्ये हे प्रकार अनेकदा घडल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात नोंदवले आहे. तसेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आक्षेपार्ह ग्रुपची लिंक पाठवतात. त्यात सेक्सशी संबंधित मजकूर असतो. त्यावर क्लिक केल्यास फोनमधील डेटा पळवला जातो. तर आणखी एक ग्रुप डेटिंग व सेक्सशी संबंधित चर्चा करतो. त्यात अनेक अधिकारी फसतात.
डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्याचे गाजत असलेले उदाहरण आहे. ते पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकले. त्यांनी अत्यंत महत्त्वाचा गुप्त व तंत्रज्ञान संशोधनाची माहिती पुरवली. त्यांना ब्लॅकमेल करून ही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.
व्हॉट्सअॅपद्वारे हॅकिंग
काही दिवसांपूर्वी संरक्षण लेखा प्रधान नियंत्रक विभागाच्या अधिकाऱ्याला (पीसीडीए) बनावट कॉल आला. मात्र, त्याला हॅकिंगचा कॉल असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला उत्तर देणे टाळले. त्यानंतर त्याच्या व्हॉट्सॲॅपवर एक लिंक आली. या लिंकवर कोणी क्लिक केल्यास फोनमधील सर्व डेटा हॅकरला मिळतो.