

पालघर : नागरिकांना रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील गोदाम लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी डहाणू तहसील कार्यालयात करण्यात आली.
सचिन बाळासो व्हरगर हा डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गोदाम लिपिक आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रेशनकार्ड काढून देण्यासाठी प्रति रेशनकार्ड ५०० रुपये याप्रमाणे ८ रेशनकार्डसाठी एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार १८ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे तक्रार केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २ सप्टेंबर रोजी डहाणू तहसील कार्यालयात कायदेशीर सापळा रचला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडून ६ रेशनकार्डचे मोबदला म्हणून ३ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश लक्ष्मण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून दादाराम सुभाष करांडे, पोलीस उप-अधीक्षक, प्रकाश दळवी, जितेंद्र गवडे, आकाश लोहारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांचा सहभाग होता.