

वाडा : पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, तलासरी आणि डहाणू तालुक्यांतील बाधित भागांमध्ये प्रशासनाने बचावकार्य वेगाने सुरू केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने २८४ कुटुंबांतील १,१५५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी शासकीय निवारा केंद्रे तसेच नातेवाईकांच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीचा फटका पालघर तालुक्यातील किराट, चहाडे, नागझरी, कोकनेर, गुंदले आणि चिंचारा, तलासरी तालुक्यातील वडवली-सावणे, वासा, गिरगाव, घिमनिया, खोचई, सुत्रकारे व उधवा, तसेच डहाणू तालुक्यातील मल्याण, डहाणू, बोर्डी, चिखले, सारावली, कोलवली, चिंचणी, सावता आणि साये आदी गावांना बसला आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यात अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. आगवण येथील जगदीश वासन मच्छी (३९) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर आंबेवाडी (लाखतपाडा) येथील रूपेश पांडुरंग धाडगा (३०) यांचा पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला. आणखी एका मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
१३.५५ कोटींचा प्राथमिक खर्च अपेक्षित
पुराचे पाणी ओसरलेल्या भागांत महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २९.४५ किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले असून, २४ क्रॉस-ड्रेनेज/कॉजवे आणि सहा पुलांचेही नुकसान झाले आहे. दुरुस्तीसाठी सुमारे १३.५५ कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, प्रशासन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समन्वयातून अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, उर्वरित बाधित मार्गांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, सर्व यंत्रणा सज्ज आहेत.