

पालघर/मुंबई : दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या ‘गोविंदां’च्या वैद्यकीय बिलावरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हा व शहरप्रमुखांसह आमदाराच्या मुलावर आणि अन्य कार्यकर्त्यांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन बालकृष्ण सांखेसह शहरप्रमुख राहुल रामदास घरात आणि आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना रविवारी पहाटे पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये घडली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान जखमी झालेल्या ‘गोविंदां’ना उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. रुग्णालयातील बिलिंग रिसेप्शनिस्ट विवेक बाबुलिंगा (२३) यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत ही माहिती देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मानवी मनोरे रचताना खाली पडल्याने जखमी झालेले ओंकार कळवडकर, आकाश पाटील, हितेश चौधरी, केशव ठाकूर आणि अनिकेत महावंश यांना उपचारासाठी रिलीफ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्यांचे बिल १९,८६६ रुपये झाले. त्यापैकी १० हजार रुपये एका सहकाऱ्याने रोख स्वरूपात भरले होते. मात्र, उर्वरित रक्कम न भरता रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात यावे, अशी मागणी जमावाने केल्याने वाद निर्माण झाला.
रात्री सुमारे १.१५ वाजता सांखे आणि घरात यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० जणांचा जमाव रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात घुसला. त्यांनी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर लिजोमोल यांना शिवीगाळ केली आणि रिसेप्शनिस्ट बाबुलिंगा यांना चापट मारल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर जमावाने अतिदक्षता विभागात प्रवेश केला. त्यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला. जमावाने उपचार घेत असलेल्या एका जखमी ‘गोविंदाला’ आयसीयूमधून जबरदस्तीने बाहेर काढल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.