पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे; राज्य सरकारने दिली मान्यता

राज्यात सत्ताबदलानंतर आता नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती
पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे; राज्य सरकारने दिली मान्यता

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. याप्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येत होती. राज्यात सत्ताबदलानंतर आता नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती.त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निर्घृणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले. याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयातही राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवाल सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केला होता.

पालघर जिल्ह्यात १६ एप्रिल २०२० रोजी गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला केला. यात दोन साधू आणि वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. हे प्रकरण हाताळताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, या प्रकरणानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in