

नितीन बोंबाडे
पालघर : जिल्ह्यातील वाढवण बंदराविरोधात जनआक्रोश वाढत असून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी शुक्रवारी दिला. वरोर येथे वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आयोजित जाहीर सभेला पालघर जिल्ह्यासह मुंबई, वसई-विरार आणि परिसरातील हजारो भूमिपुत्रांनी उपस्थिती लावली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मच्छिमार संघटना, महिला आणि युवकांच्या सहभागातून बंदरविरोधी आंदोलनाचे व्यापक स्वरूप दिसून आले. शासनाने वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही, असा ठाम इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला.
या सभेला आमदार अंबादास दानवे, आमदार विलास कोटणीस, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, सुनील भुसारा, कपिल पाटील, राजेश पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, केदार दिघे, रामकृष्ण तांडेल यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना तसेच विविध मच्छीमार संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
प्रकल्प रद्द होईपर्यंत विरोध -निकोले
‘हे बंदर आम्हाला नको. वाढवण बंदर रद्द करा’ जोपर्यंत शासन हा प्रकल्प रद्द करत नाही, तोपर्यंत आमचा विरोध मागे घेतला जाणार नाही. उद्यापासून एकही डंपर चालू देणार नाही,' असा आक्रमक पवित्रा आमदार विनोद निकोले यांनी सभेत मांडला. ‘आपला श्वास आणि आपली जमीन वाचवण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. हा लढा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून आपल्या हक्कांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
...तर देशातील ३५०० प्रकल्पांवर गदा : सपकाळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत वाढवण बंदराच्या मुद्द्यावर भाष्य केले. वाढवण बंदर रद्द झाल्यास देशातील ३५०० प्रकल्प रद्द होतील, असे त्यांनी सांगितले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या उपस्थितीत वरोर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच वरोरकडे जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. बसेस आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते, तर काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात कडक पोलीस नियंत्रण आणि आंदोलनस्थळी मोठी गर्दी असे चित्र दिवसभर दिसत होते.