

पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला बुधवारी वरोर येथे तीव्र संघर्षाचे स्वरूप आले. संघर्ष समितीच्या आवाहनानंतर तीन हजारांहून अधिक महिलांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक महिला आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या घटनेत काही महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या असून पोलिसांनी तीन हजारांहून अधिक महिलांना ताब्यात घेतले. वरोर येथे सुमारे सात हजार आंदोलकांच्या उपस्थितीत बंदरविरोधी आंदोलन करण्यात आले.
डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिक, शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि महिला मोठ्या संख्येने एकत्र आले होते. संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या सभेत विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रकल्पाविरोधात भूमिका मांडली.
सभेनंतर महिलांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत लहानी दौडा, सुनीता शिंगडा आणि प्राची हातिवलेकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या. पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन वाहनांतून डहाणू येथे नेले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या आंदोलनाला आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे, ब्रायन लोबो यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी संबोधित केले. माकप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, बहुजन विकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.
दरम्यान, २५ नोव्हेंबरपासून डहाणू प्रांत कार्यालयासमोर सुमारे पाच हजार आंदोलकांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. वनजमिनी व अन्य जमिनींचे कसणाऱ्यांच्या नावे हक्क, महिलांची बंद केलेली आर्थिक मदत पुन्हा सुरू करणे, पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे आणि स्मार्ट मीटरला विरोध अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
वाढवण बंदरामुळे स्थानिक शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि पर्यावरणावर परिणाम होणार असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.