

पालघर : डहाणू तालुक्यातील गंजाड-मणिपूर येथे खदानीत बुडून अक्षय सुभाष खेवरा (१८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अक्षय जवळच्या खदानीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
अक्षयचे आई-वडील शोध घेत असताना खदानीजवळ त्याचे कपडे आणि चपला आढळून आल्या. त्यामुळे तो खदानीतील पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डहाणू नगरपालिका अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक रहिवाशांनी खदानीत शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अक्षयचा मृतदेह आढळून आला.