उपनगरीय रेल्वे मार्गावरील ७९ स्थानकात लवकरच ‘पॅनिक बटन' सुविधा

संकटकाळात प्रवाशांना पोहचणार जलद सहकार्य; रेलटेलद्वारे ७५६ स्थानकात व्हिडीओ सव्‍‌र्हिलन्स सिस्टिम कार्यरत होणार
उपनगरीय रेल्वे मार्गावरील ७९ स्थानकात लवकरच ‘पॅनिक बटन' सुविधा

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी, टुरिस्ट टॅक्सी, प्रवासी बससह नव्याने नोंदणी होणाऱ्या सर्वच सार्वजनिक वाहनांना ‘पॅनिक बटन’ आणि ‘व्हेईकल ट्रॅकिंग’ यंत्रणा बसवण्याचे कामकाज सुरु आहे. यापाठोपाठ रेल्वे प्रशासनाने देखील उपनगरीय रेल्वे मार्गावरील ७९ स्थानकांवर पॅनिक बटण बसवण्याचा निर्णय घेतला आहे. संकटाच्या वेळी प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील ७९ स्थानकांचाही यात समावेश आहे. तर ‘रेलटेल’च्या मदतीने देशभरातील ७५६ रेल्वे स्थानकात अत्याधुनिक दूरदृश्य देखरेख प्रणाली (व्हिडीओ सव्‍‌र्हिलन्स सिस्टिम) कार्यरत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहनांनी वाहतूक करत असताना महिला प्रवाशांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना, त्याचप्रमाणे चोऱ्या, अपघात अशा अनेक घटना घडतात. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता आपत्कालीन परिस्थीतीत पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधता यावा यासाठी पॅनिक बटन यंत्रणा बसवण्याची मागणी प्रवासी संघटना प्रवाशांकडून करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वीच केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ मध्ये (एच)मध्ये ही तरतूद केली आहे. नुकतेच रेल्वे प्रशासनाने देखील याबाबत निर्णय घेतला असून लवकरच ७९ रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण यंत्रणा राबवण्यात येणार आहे. तसेच रेलटेल’च्या मदतीने सर्व स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहे. सध्या तीन ते चार स्थानकांचा मिळून एक नियंत्रण कक्ष आहे. त्या नियंत्रण कक्षात मोठे पडदे (स्क्रीन) असतील व स्थानकातील सर्व बाजू यात कैद होतील. एखादी घटना घडल्यास याद्वारे पाहूून त्वरित सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला घटनास्थळी पोहोचता येईल किंवा तेथे पाठवता येणार आहे.

कसे करणार फलाटावरील पॅनिक बटण कार्य?

प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन असतील. संकटकाळात ‘पॅनिक बटन’ दाबल्यास त्वरित त्या फलाटावरील सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यरत होईल. हे कॅमेरे दिशा बदलून त्वरित वळतील आणि तेथील घटना कॅमेऱ्यात कैद करून एक भोंगा (अलार्म) वाजेल. त्यामुळे स्थानकातील नियंत्रण कक्षातही पडद्यावर दिसेल आणि तात्काळ प्रवाशांपर्यंत मदत पोहोचविणे शक्य होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in