पनवेल-कर्जत रेल्वे पूर्णत्वास

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे प्रकल्प आता अंतिम टप्यात पोहोचला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या प्रकल्पाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण केले आहे.
पनवेल-कर्जत रेल्वे पूर्णत्वास
Published on

मुंबई : प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे प्रकल्प आता अंतिम टप्यात पोहोचला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या प्रकल्पाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण केले आहे.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ अंतर्गत २,७८२ कोटी खर्चुन बांधण्यात येत असलेल्या या २९.६ किमी लांबीच्या दुहेरी मार्गामुळे नवी मुंबई आणि कर्जत दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारेल, तसेच सध्याच्या गजबजलेल्या कल्याण मार्गावरील अवलंबित्व कमी होईल अशी अपेक्षा आहे.

एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व जमीन संपादित करण्यात आली असून, वन विभागाच्या मंजुरीसह सर्व महत्त्वाच्या वैधानिक परवानग्या मिळाल्या आहेत. बहुतेक मोठी कामेही पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्व ९ मोठे पूल, ३५ छोटे पूल, १६ भुयारी मार्ग, ५ उड्डाणपूल, ३ बोगदे आणि कर्जत रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश आहे. पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात आहे. मौज आणि चिखले येथील रस्ते उड्डाणपूल यापूर्वीच सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले आहेत.

रेल्वे स्थानकांच्या पायाभूत सुविधांचे कामही वेगाने आकारास येत आहे. पनवेल, चिखले आणि मौज येथील स्टेशन इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्या प्रणाली उभारणीच्या कामांसाठी सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

चौक आणि कर्जत स्थानकांवरील बांधकाम वेगाने सुरू असून, प्लॅटफॉर्मची निर्मिती, लिफ्ट, जिने आणि प्रवाशांच्या इतर सोयी-सुविधांचे काम पूर्णत्वाकडे आहे. रुळ जोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणेचे कामही प्रगत टप्प्यात आहे. मौज आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमच्या 'फॅक्टरी एक्सेप्टन्स टेस्ट्स' आधीच पूर्ण झाल्या आहेत.

प्रवासाचा वेळ वाचणार

हा मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल आणि कर्जत दरम्यान थेट उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध होईल. ज्यामुळे प्रवाशांना कल्याण जंक्शनवरून जाणाऱ्या गर्दीच्या उपनगरीय नेटवर्कला एक उत्तम पर्याय मिळेल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, रेल्वे ऑपरेशन्समध्ये लवचिकता येईल आणि नवी मुंबई, कर्जत व आसपासच्या भागात वेगाने विकसित होणाऱ्या निवासी व औद्योगिक क्षेत्रांच्या वाढीस चालना मिळेल. मुंबई महानगर प्रदेशात नियोजित असलेल्या इतर इतर मोठ्या पायाभूत सुविधांच्या विकासापूर्वी हा प्रकल्प प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करेल अशी अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in