
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखली दरम्यान ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेमार्फत राबविला जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध प्रकल्प राबवत आहे. प्रवाशांचा प्रवास गतिमान करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
या नवीन लिंकमुळे रेल्वेची क्षमता वाढेल आणि गर्दी कमी होईल. तसेच प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची वाहतूक सुरळीत आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. ते उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत असे अनेक दिशांना एक महत्त्वाचे जंक्शन म्हणून आहे. सध्या, ग्रेड-सेपरेटेड
क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सल झाल्यामुळे परिचालनसाठी विलंब होतो.
जेएनपीटी-कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाइन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाइन
काळदुंरीगाव केबिन आणि सोमटणे स्टेशन दरम्यान दुसरी कॉर्ड लाइन
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाला ४९४.१३ कोटी रुपये मंजूर
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनिशिंगणापूर यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हा रेल्वे मार्ग २१.८४ किमी लांबीचा असून यासाठी ४९४.१३ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
शनिशिंगणापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. दररोज ३० ते ४५ हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र या ठिकाणी रेल्वे जोडणी नसल्याने भाविकांची येथे ये-जा करताना गैरसोय होते. भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गामुळे भाविकांना आध्यात्मिक केंद्रापर्यंत पोहचणे सोईस्कर होणार आहे. यासोबतच विशेषतः राहुरी आणि जवळील भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. या मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही फायदा होण्याबरोबरच स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
सविस्तर प्रकल्प अहवालात दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव आहे. यामध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक असलेल्या या केंद्राकरिता ही पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुधारण्यासाठी हा विकास एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.