परळ टीटी उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच बंद

परळ टीटी उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच बंद

वाहतूक पोलिसांबरोबर आज बैठक

मुंबई : परळ टीटी उड्डाणपुलाच्या मजबुतीसाठी पूल लवकरच बंद करण्यात येणार आहे. मात्र डिलाईल रोड पुलाची एक लेन सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई शहरात वाहतुकीचा बोजवारा उडू शकतो. यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी मंगळवारी वाहतूक पोलिसांबरोबर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वाहतूक पोलिसांच्या सूचना जाणून घेतल्यावर पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरांना जोडणाऱ्या परळ टीटी उड्डाणपुलाला ४२ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे पुलाच्या मजबुतीसाठी या महिन्यापासून काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीचे हाईट बॅरियर बसवण्यात येणार आहेत. पावसाळी कामांसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पान्शन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजवण्यात आले आहेत. पावसाळी कामासाठी १ जूनपासून दुचाकी वाहनांना पुलावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी वाहतूक पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले आहे. या पुलावर २.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र!

लोअर परळच्या उड्डाणपूलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टीटी उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबरमध्ये हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी पूलाच्या मजबूतीकरणासाठी पूल विभागाकडून कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनीही या पुलाच्या कामासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे. मात्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडू नये, यासाठी मंगळवारी वाहतूक पोलिसांबरोबर बैठक पार पडणार असून त्यानंतर पूल पूर्णत: बंद करण्यात येईल.

खर्च व वेळेची बचत!

परळ टीटी उड्डाणपुलाचे काम या महिन्यापासून हाती घेण्यात येणार आहे. साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी या कामासाठी अपेक्षित आहे. तसेच या उड्डाणपुलाच्या कामासाठी १८ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. विद्यमान उड्डाणपुलाच्या पायाचा आधार घेऊनच नव्या उड्डाणपुलाचा सॉलिड रॅम्प स्थिर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवा उड्डाणपूल बांधण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in