

मुंबई : परळ बस आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांत अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनाला आले. या प्रकाराची स्वतंत्र विभागीय चौकशी समिती नेमून अहवालाच्या आधारे दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
परगावी कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य समोर येऊ लागले आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी केवळ अपघाताला निमंत्रण देत नाही, तर एसटीच्या प्रवासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
...तर निलंबित करणार
कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे चाचणी अनिवार्य करण्यात यावी. चाचणीत दोष आढळल्यास अशा कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेशही दिले आहेत.