Mumbai : परळ स्थानकाचे पुन्हा नूतनीकरण; विस्तारीकरणासाठी नव्या बांधकामावर हातोडा?

जवळपास वर्षभरापूर्वीच ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या मुंबईतील परळ रेल्वे स्थानकावर आता हातोडा चालणार आहे. परळ स्थानकाचा काही भाग आता पाडावा लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्याचा फटका या नव्या बांधकामाला बसू शकतो.
Mumbai : परळ स्थानकाचे पुन्हा नूतनीकरण; विस्तारीकरणासाठी नव्या बांधकामावर हातोडा?
Published on

फ्री प्रेस जर्नल/मुंबई

जवळपास वर्षभरापूर्वीच ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या मुंबईतील परळ रेल्वे स्थानकावर आता हातोडा चालणार आहे. परळ स्थानकाचा काही भाग आता पाडावा लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्याचा फटका या नव्या बांधकामाला बसू शकतो. जुन्या परळ वर्कशॉपला ‘परळ टर्मिनस’ जोडण्याचे नव्या प्रकल्पात प्रस्तावित आहे.

सुमारे १९ कोटी रुपये खर्चून परळ स्थानकाचा कायापालट करण्यात आला होता. यामध्ये पूर्व दिशेला स्थानकाची नवीन देखणी इमारत, सुधारित तिकीट खिडक्या, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह स्वच्छतागृह, छोटे उद्यान (मिनी गार्डन), प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आणि दुचाकींसाठी उन्नत पार्किंग यांसारख्या सुविधांचा समावेश होता. आता यातील अनेक सुविधांवर टांगती तलवार आहे.

मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “उद्यान आणि इतर काही सोयीसुविधा कदाचित हटवाव्या लागतील. तिकीट खिडक्या आणि पार्किंग यांसारख्या मुख्य सुविधांचे नुकसान कमीत कमी व्हावे, यादृष्टीने आम्ही रेल्वे मार्गिकेच्या आराखड्यात बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र अंतिम आराखडा अजून विचाराधीन आहे.”

पुढील टप्प्यात जर हा रेल्वे कॉरिडॉर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने नेला, तर मात्र नूतनीकरण केलेल्या संपूर्ण इमारतीवरच हातोडा चालवावा लागण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, ७१४ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याने आणि जमिनीच्या संपादनातील अडथळे दूर झाल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रेल्वे मंत्रालयाने कुर्ला-परळदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला मंजुरी दिली होती.

आकडेवारीवर एक नजर

  • नूतनीकरणाचा खर्च (परळ): १९ कोटी रुपये

  • नूतनीकरणाचे उद्घाटन: मे २०२४

  • नव्या टर्मिनसचा अंदाजित खर्च: ५०० कोटी रुपये

  • टर्मिनसमधील प्रस्तावित प्लॅटफॉर्म: ४ (२ मोठे)

  • ट्रेन क्षमता: २६ डबे

logo
marathi.freepressjournal.in