पालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा; मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा अधिक ओढा आहे.
पालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा; मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा अधिक ओढा आहे. यासाठी महापालिकेने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मागीलवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमेश कंकाळ यांनी दिली.

मुंबईतील पालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये पटसंख्येचा आलेख दिवसेंदिवस खाली येत आहे. झोपडपट्टीतील छोट्याशा घरात राहणाऱ्या पालकांनासुद्धा आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे असे वाटू लागले आहे. त्यानुसार महानगरपालिकेने मुंबईत आयबी आणि आयसीसी तसेच आयजीसीएसई या बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू केली आहे, तर सीबीएससी बोर्डाच्या १८ शाळा सुरू आहेत. महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या एकूण अकराशे शाळा मुंबईत आहेत. या शाळांमधून तीन लाख ४७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आता अन्य बोर्डांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यावर्षीही प्रक्रिया १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान सुरू राहणार आहे. त्यामुळे या २१ शाळांमध्ये प्रवेश नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सीबीएसई बोर्डाच्या शाळांत १० हजार ३७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश

महापालिकेने अन्य बोर्डाच्या सुरू केलेल्या शाळांमध्ये मागील वर्षी सीबीएसई बोर्डाच्या शाळांत नर्सरी ते सहावीपर्यंत दहा हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर आयसीएसई बोर्डाच्या शाळेत २३० विद्यार्थ्यांनी नर्सरी वर्गात प्रवेश घेतला. आयबी बोर्डाच्या शाळेत नर्सरीमध्ये ७८ विद्यार्थ्यांनी, तर आयजीसीएसई बोर्डाच्या शाळेत नर्सरीमध्ये १७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला होता. एकूण दहा हजार आठशे सात विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in