मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांनी सतत काहीतरी नवीन करत राहिले पाहिजे; ज्यामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढेल. प्रगतीसाठी मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे, असे मत भारतीय मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय कुमार यांनी व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ‘शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. कुमार बोलत होते. दरम्यान, शिक्षकांसह पालकांनी ही मुलांसोबत सतत संवाद साधला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोनंतरचे शिक्षण, लैंगिकता, किशोरावस्था आणि शालेय मानसिक आरोग्याच्या संबंधात पौगंडावस्थेतील बाबी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखील या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात राज्यभरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
या चर्चासत्राला राज्यभरातील शाळांमधून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील जवळपास ६०० पेक्षा अधिक शाळांनी या चर्चासत्रात सहभागी नोंदविला. यावेळी मुंबई मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश देसूसा, डॉ. केर्सी चावडा यांच्यासह तज्ञांनी मार्गदर्शन केले.
पालकांचीही जबाबदारी!
शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांचीदेखील तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. मुलांच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी त्यांचे मानसिक आरोग्य चांगलं राहणं ही अतिशय गरजेची बाब आहे. त्यामुळेच मुलांना रोजच्या रोज व्यायाम, पोहणे, शारीरिक खेळ, बौद्धिक खेळ, वाचन, चित्र काढणे यासोबतच नवनवीन गोष्टी शिकणे फार महत्त्वाचे असते. यासाठी शिक्षकांबरोबर पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा सूर चर्चासत्रात उमटला.