
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत मध्य रेल्वे मार्गावरील १५ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. यासाठी स्थानकांमध्ये उद्यानांची निर्मिती करण्यात येणार असून, उद्यानांसाठी तब्बल १४ कोटी ७२ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. लवकरच याचे कंत्राट देण्यात येणार आहे. यानंतर वर्षभराच्या कालावधीत स्थानकात बगीचे विकसित करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
प्रवाशांना अधिक चांगल्या आणि आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अमृत भारत योजने अंतर्गत स्थानकांचा पुर्नविकास करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. यामध्ये देशातील एकूण १ हजार २७५ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेवरील १५ स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांच्या पुर्नविकासासाठी रेल्वेने जलद गतीने निविदा काढण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापुर्वीच दिले आहे. त्यानुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पुर्नविकासाकरिता निविदा काढण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, स्थानकांचा पुर्नविकास करताना प्रवासी सुविधांवर भर देण्यासोबत स्थानक परिसर स्वच्छ आणि हिरवागार दिसण्यासाठी प्रशासनाकडून अधिक प्रयत्न करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून स्थानक परिसरात उद्याने तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार स्थानकातील मोकळ्या जागेत, पादचारी पुल आणि फलाटामधील रिकाम्या जागेत हे बगीचे फुलविण्यात येणार आहेत. या उद्यांनामुळे स्थानकांच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
'या' स्थानकांबाबत चर्चा
सँडहर्स्ट रोड, वडाळा, कुर्ला, परळ, माटुंगा, दिवा, मुंब्रा, शहाड, टिटवाळा, चिंचपोकळी कांजूरमार्ग, विक्रोळी, भायखळा आणि विद्याविहार स्थानकाचा एका योजनेत समावेश आहे.