काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळला, स्थानिक रहिवाशांची सुखरुप सुटका
काळबादेवी बदाम वाडी येथे म्हाडाची ८० वर्षे जुन्या चार मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसून इमारतीत अडकलेल्या ६० ते ७० रहिवाशांना स्थानिक रहिवाशांची सुखरुप सुटका केल्याचे मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मालक व भाडेकरुंच्या वादामुळे दुरुस्तीचे काम रखडल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
बदाम वाडी, काळबादेवी रोड काळबादेवी येथील इमारत क्रमांक ३३९ व ३४१ इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोसळला. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत ६० ते ७० लोक अडकले होते. स्थानिक रहिवाशांनी अडकलेल्यांची सुखरुप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या इमारतीची अडीच वर्षांपासून दुरुस्तीचे काम सुरु होते. मात्र मालक व भाडेकरुंच्या वादामुळे दुरुस्तीचे काम रखडले होते. चार फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, आठ कामगार व एक जेसीबी घटना स्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरु केले. इमारतीचा भाग कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते.