एसी लोकल विरोधात स्टेशन मास्तरला प्रवाशांचा घेराव, बदलापूरमध्ये नागरिकांचा कडाडून विरोध
बदलापूर स्टेशन मास्टरला रेल्वेप्रवाशांनी घेराव घातला. एसी लोकलला विरोध दर्शविण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास २०० ते २५० प्रवाशांनी एकत्र येत स्टेशन मास्तरला घेराव घातला. त्यामुळे रेल्वे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. बदलापूर रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ६.५५ची एसी लोकल सुरू करण्यात आलीआहे. ती रद्द करून त्या जागी साधारण लोकल सुरू करावी अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. ही लोकल सुरू झाल्याने नॉर्मल लोकल रद्द करण्यात आली आहे. शिवाय एसी लोकल सुरू झाल्याने तिचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. त्याच्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. याच प्रकारचे निवेदन देण्यासाठी स्टेशन मास्तरला प्रवाशांनी घेराव घातला. या आधी देखील स्टेशन मास्तरला प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांची कोणतीही दखल रेल्वेप्रशासनाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे रेल्वेप्रवाशांचा उद्रेक झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने १० एसी लोकल सुरू आहेत. त्या विरोधात यापूर्वीही काही ठिकाणी आंदोलन झाली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर बंदोबस्त लावला होता. मात्र तेव्हा प्रवाशांनी आपला संताप व्यक्त न करता संध्याकाळी संताप व्यक्त केल्याने पोलिसांची तारंबळ उडाली.