बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडणे, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबर बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व टिकवण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या विविध उपाययोजना सुरू आहेत. आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी मुंबईतील बसस्थानकांवर ई-बाईकची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.
बेस्ट बसमधून उतरल्यावर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वोगो कंपनीच्या माध्यमातून ई-बाईक सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अंधेरी येथे पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईतील बसथांब्यावर ई-बाईक सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. ई-बाईकची सगळी जबाबदारी संबंधित कंपनीची असून, यामुळे बेस्ट प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. सोयीस्कर व्हावे, यासाठी ई-बाईक सेवा सुरू करण्यात येत आहे, असे लोकेश चंद्रा यांनी सांगितले. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह उत्पन्न व प्रवासीसंख्या वाढीसाठी बसेसचा ताफा वाढवण्यात येत आहे. सध्या ३,७०० बसेस असून २०२७ पर्यंत १९ हजार बसेस ‘बेस्ट’च्या ताफ्यात सामील होतील. तर २०२३पर्यंत सहा हजार ८०० बसेसचा ताफा असेल. यापूर्वी १ कोटी ७० लाख रुपये दैनंदिन उत्पन्न मिळत होते; मात्र सद्य:स्थितीत रोज २ कोटी २५ लाख रुपये महसूल मिळतो, अशी माहिती चंद्रा यांनी दिली. बेस्ट उपक्रमाला स्वतःची बस चालवण्यासाठी प्रति किलोमीटर १४० रुपये खर्च येतो; परंतु भाडेतत्त्वावरील बसेससाठी हाच खर्च ४६ रुपये येतो. तसेच भाडेतत्त्वावरील बसेसची जबाबदारी कंत्राटदाराची असून चालक, देखभालीचा खर्च कंपनीलाच करावा लागतो.