कमल मिश्रा/मुंबई
उन्हाळा सुरू झाल्यानंतर ‘एसी’ ट्रेनकडे प्रवाशांचा ओढा वाढू लागला आहे. त्यातूनच आता मध्य रेल्वेवर ‘एसी’ लोकलच्या प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ‘एसी’ प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फेब्रुवारीत ‘एसी’ लोकलमधून १८.८४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मार्चमध्ये हेच प्रमाण २०.६७ लाखांवर गेले आहे. यातूनच प्रवासी ‘एसी’ सेवेकडे वळण्याचे दिसत आहे.
‘एसी’ रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी या प्रवासाला सुखावले आहेत. डोंबिवलीच्या रहिवासी स्मिता देशमुख म्हणाल्या की, मध्य रेल्वेने गाड्यांच्या फेऱ्या व क्षमता वाढवली पाहिजे. कारण गर्दीच्या वेळी अधिकाधिक सेवा चालवल्या गेल्या पाहिजेत.
तर कल्याणला राहणारे सुहास देशपांडे म्हणाले की, ‘एसी’ लोकलच्या फेऱ्या वाढणे म्हणजे प्रवाशांमध्ये त्याची लोकप्रियता वाढल्याचे दिसत आहे. मुलुंडचे कल्पेश शहा म्हणाले की, दैनंदिन प्रवाशांपासून ते अधूनमधून प्रवास करणाऱ्यांपर्यंत, आरामदायी आणि सुविधांनी विविध प्रकारच्या प्रवाशांना कसे आकर्षित केले आहे यावर प्रकाश टाकला. तर घाटकोपरचे निशीकांत माने म्हणाले की, रेल्वेने ‘एसी’ फेऱ्यांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. विशेषत: गर्दीच्या वेळी ‘एसी’ लोकलची सेवा वाढवणे गरजेचे आहे.