
मध्य रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षातील एकट्या एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेवरील एसी लोकलने १५ लाख ३ हजार ८७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून ७ कोटी ८ लाख ७८ हजार ६०० रुपयांची कमाई मध्य रेल्वेने केली आहे. गतवर्षीपेक्षा दहा पटीने यंदा प्रवासी संख्या वाढल्याचे देखील मध्य रेल्वेने सांगितले.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. वाढत्या मागणीनंतर ५ मे २०२२ पासून तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. तिकीट दरातील कपातीला वर्ष पूर्ण होत असताना एसी लोकलमधील प्रवासी देखील कमालीचे वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण/बदलापूर /टिटवाळा या उपनगरीय विभागात ५६ वातानुकूलित सेवा चालवत आहे.
दरम्यान, मार्च महिन्याच्या अखेरपासून तीव्र उष्णतेमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. या रोजच्या त्रासातून सुटका करण्यासाठी प्रवाशांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेवर १५ लाख ३ हजार ८७ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला असून यातून तब्बल ७ कोटी ८ लाख ७८ हजार ६०० रुपयांची कमाई केली आहे. गतवर्षी एप्रिल २०२२ मध्ये केवळ ५ लाख ९२ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा मात्र यामध्ये दहा पटीने वाढ झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.