प्रत्येक आगारात सुटणार प्रवाशांच्या समस्या!सोमवारी, शुक्रवारी प्रत्येक आगारात ‘प्रवासी राजा दिन’; १५ जुलैपासून योजनेला सुरुवात

प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक एसटी आगारात आता दर सोमवारी आणि शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे.
BEST
BEST
Published on

मुंबई : प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक एसटी आगारात आता दर सोमवारी आणि शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत. ही योजना १५ जुलैपासून सुरू होणार आहे.

प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालयांना आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडता येणार आहेत. तक्रारींवर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करणार आहेत. ‘प्रवासी राजा दिन’ कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या-त्या वेळी जाहीर करणार आहेत. तसेच प्रत्येक लेखी तक्रारींची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

एसटीच्या विविध बसेसमधून दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहेही स्वच्छ, निर्जंतुक ‍आणि टापटीप असावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवासी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. यामुळे प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे.

प्रवाशांनी समस्यांचे निराकरण करावे - जुवेकर

प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्याचा उद्देश ठेवून येत्या १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा दिन’ या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in