मुंबई : मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या लोकल अपघातातील मृत्यूनंतर मोटरमननी अचानक काम करण्यास नकार देत शनिवारी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मोटरमन नसल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील ८४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर १०० लोकल खोळंबल्या. दुपारी अडीच वाजल्यापासून हा गोंधळ सुरू होता.
मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वे सिग्नल ओलांडल्यामुळे त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. त्यातच सँडहर्स्ट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रेल्वे अपघातात त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, त्यांचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराची वेळ सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बर मार्गावरील शेकडो मोटरमननी अतिरिक्त काम करण्यास नकार दिला.
प्रवासी संतापले : प्रवाशांच्याही संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रेल्वे कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. गेल्या दीड-दोन तासांपासून लोकल सेवा बंद आहे. मध्य आणि हार्बर लाईनवर जाणाऱ्या लोकल फलाटाला लावून ठेवल्या आहेत. उद्घोषणा बंद आहे. यामुळे लोकल कोणत्या कारणासाठी रखडल्या आहेत याची माहिती प्रवाशांना कळत नव्हती. दुपारी अडीच वाजेपासून हा गोंधळ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लोकल रद्द झाल्याने प्रवासी संतापले आहेत. आरपीएफही प्रवाशांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. गाडी अनाऊन्स करायला पाहिजे. गाडी लेट आहे, हे कोण सांगणार आहे? असा सवाल प्रवाशांकडून होत आहे. आम्ही अर्ध्या तासापासून स्टेशनमध्ये उभे आहोत. आम्हाला घरी जायचं आहे, कोण सांगणार? असा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.