मध्य रेल्वेचे प्रवासी बेहाल

मध्य रेल्वेची अवस्था "रोज मरे त्याला कोण रडे" या उक्तीप्रमाणे झाली आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मध्य रेल्वेची अवस्था "रोज मरे त्याला कोण रडे" या उक्तीप्रमाणे झाली आहे. आठवड्याचा पहिला दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी लोकल गोंधळाने सुरू झाला. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा दीड तास विस्कळीत झाली होती. यातून सावरत असतानाच वादळी पावसामुळे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलुंड ते ठाणे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर आणि खांब रुळावर कोसळल्याने पुन्हा लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे दिवसभर थकून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

सकाळी ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अप मार्गावर लोकलगाड्यांची एकामागोमाग रांग लागली होती. त्यामुळे कल्याण ते कुर्ला स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या गोंधळामुळे लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे मार्गावरून चालत कार्यालय गाठले.

या गोंधळाचा पहिला भाग संपत नाही तोवर सायंकाळी वादळी पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. ठाणे ते मुलुंडदरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आली. यामुळे घरी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी झाली. दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा मुख्य रेल्वे स्थानकात तुडुंब गर्दी झाली होती. वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. लोकल सुमारे ४५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

मेट्रो १ विस्कळीत

वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर या मेट्रो १ मार्गावर सायंकाळी ४.२५ वाजण्याच्या सुमारास एअर पोर्ट स्थानकात वादळामुळे हवेतून आलेला कापड ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे मेट्रो १ ची वाहतूक विस्कळीत झाली. विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ओव्हरहेड वायरमधून कपडा काढला.

विमानसेवेलाही फटका

धुळीच्या वादळाचा फटका छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही बसला. वादळामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमानतळाची धावपट्टी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत काही विमानांचे लँडिग अन्यत्र वळविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in