
मुंबई : पाठलाग प्रकरणातील एका आरोपीला त्याचा पासपोर्ट नूतनीकरणासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट (स्वीकृती प्रमाणपत्र) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलीस आणि पासपोर्ट विभागाला दिले. शिक्षणासाठी कॅनडाला जाण्यासाठी आवश्यक क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळावे यासाठी या आरोपीने याचिका दाखल केली होती.
न्या. जी. एस. कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने मागील महिन्यात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोर्टाने परदेश प्रवासास परवानगी दिली असताना पोलिसांनी क्लिअरन्स सर्टिफिकेट द्यायला हवे होते.
याचिकाकर्त्याने नमूद केले की, कनिष्ठ दंडाधिकारी न्यायालयाने त्याला पासपोर्ट नूतनीकरणासाठी परवानगी दिली आहे. तसेच एप्रिल २०२५ मध्ये उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने त्याला त्याच्या अभ्यासक्रमाच्या कालावधीत परदेश प्रवास करण्याची परवानगी दिली होती, असेही याचिकेत नमूद केले. न्यायालयाने आदेशात म्हटले की, नव्हेंबर २०२४ मध्ये पासपोर्ट नूतनीकरणास परवानगी देणारा आदेश मजिस्ट्रेट कोर्टाने दिला असताना, पोलिसांनी नकारात्मक अहवाल देणे योग्य नव्हते.