पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात रुग्णमित्र हेल्प डेस्क

नायर रुग्णालयात नोंदणी कक्ष विभागाजवळ हेल्प डेस्क उभारला असून, लवकरच नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येईल.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात रुग्णमित्र हेल्प डेस्क

मुंबई : औषध कुठं मिळत, ही ओपीडी कुठं याची माहिती आता पालिकेच्या रुग्णालयात एंट्री पाॅईटवरच मिळणार आहे. केईएम रुग्णालयात हेल्प डेस्क रुग्ण सेवेत कार्यरत असून, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह सर्वसाधारण रुग्णालयात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवस असो वा रात्र रुग्ण व नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी तीन शिफ्ट मध्ये हेल्प डेस्क कार्यरत असणार आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.

मोफत व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात मोठ्या विश्वासाने उपचारासाठी दाखल होतात. पालिकेच्या रुग्णालयात दररोज ५० हजारांहून रुग्णांवर उपचार केले जातात आणि यापैकी काही रुग्णांचा गंभीर आजार लक्षात घेता उपचारासाठी दाखल केले जाते; मात्र रुग्णालयात आल्यानंतर कुठला विभाग कुठे, डॉक्टर कुठे बसतात, रजिस्ट्रार ऑफिस कुठे, औषध कुठे मिळणार, ऑपरेशन थिएटर कुठे याचा शोध घेण्यात रुग्णांच्या नातेवाइकांचा वेळ जातो. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 'रुग्ण मित्र हेल्प डेस्क' सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. पालकमंत्री लोढा यांच्या सुचनेनुसार २९ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेद्वारे हेल्प डेस्क सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि २३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते केईएम रुग्णालयात प्रवेशद्वार क्रमांक १ व ७ याठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रथम रुग्ण मित्र हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. आता मुंबई महापालिकेच्या २५ मुख्य रुग्णालयात २५ डिसेंबरपर्यंत २५ रुग्ण मित्र हेल्प डेस्क सुरू करावेत, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले आहेत.

तीन सत्रांत रुग्ण मित्र हेल्प डेस्क!

रुग्णालयांच्या प्रमुख प्रवेशद्वार अथवा नोंदणी कक्षाच्या ठिकाणी हेल्प डेस्कचे कॅबिन स्थापन करण्यात येत आहे. प्रमुख रुग्णालयात सकाळी ३, दुपारी २ आणि रात्री १ याप्रमाणे तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी २ आणि दुपारी २ या प्रमाणे हेल्प डेस्कसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. रुग्णांना, त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित मदत करण्यासाठी, वेळप्रसंगी आधार देण्यासाठी नम्र आणि संवाद कौशल्य उत्तम असलेले आणि सॉफ्ट स्किल्स व्यवस्थितरित्या आत्मसात केलेले कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असेल, त्याचबरोबर संगणक हाताळण्याचे सुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असेल. या हेल्प डेस्कवरती दिशादर्शक फलक, संगणक, दूरध्वनी, नोंदणी पुस्तिका आणि सूचना पेटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

येथे डेस्क उभारण्याचे कामे सुरू

नायर रुग्णालयात नोंदणी कक्ष विभागाजवळ हेल्प डेस्क उभारला असून, लवकरच नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येईल. कूपर रुग्णालयात नोंदणी कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ हेल्प डेस्क उभारण्याचे काम सुरू आहे. वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालय, सांताक्रुझ वि. न. देसाई रुग्णालय, कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कुर्ला (प) येथील खान बहादूर भाभा रुग्णालय, गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय या उपनगरातील प्रमुख ६ रुग्णालयांमध्ये देखील रुग्ण मित्र हेल्प डेस्क उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या २५ मुख्य रुग्णालयात २५ डिसेंबरपर्यंत २५ रुग्ण मित्र हेल्प डेस्क सुरू करावेत, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले आहे, असे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in