१५ जानेवारीपासून रुग्णसेवा कोलमडणार? निवासी डॉक्टरांचा पालिकेला पाच दिवसांचा ‘अल्टिमेटम’

सध्या महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा बोजा असून हे डॉक्टर सतत मानसिक तणावाखाली काम करत आहेत.
१५ जानेवारीपासून रुग्णसेवा कोलमडणार?
निवासी डॉक्टरांचा पालिकेला पाच दिवसांचा ‘अल्टिमेटम’

मुंबई : पालिकेच्या वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि हाऊस ऑफिसर बंधीत सेवापत्र रद्द करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक यांच्या बरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत यावर निर्णय न झाल्यास पालिकेच्या केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालयातील १५०० हून अधिक निवासी डॉक्टरांनी १५ जानेवारीपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यास या चार रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली असून याला पालिका जबाबदार असेल, असे बीएमसी ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ वर्धमान रोठे म्हणाले.

राज्याच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात पालिका स्तरावर केलेल्या समुपदेशनानंतर वरिष्ठ निवासी डॉक्टरांना आणि हाऊस ऑफिसर या पदावर असलेल्या डॉक्टरांच्या एक वर्षाच्या सेवेला बॉण्ड सेवा मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी आहे. याबाबत मार्डच्या डॉक्टरांनी सोमवारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप महिस्कर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे बाँड सेवा स्वीकारण्याची मागणी केली. यामुळे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या कमी होईल, असे ते म्हणाले.

सध्या महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा बोजा असून हे डॉक्टर सतत मानसिक तणावाखाली काम करत आहेत. हा निर्णय घेतल्यास कूपर, केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील सुमारे १,४०० निवासी डॉक्टर एकत्र येऊन या निर्णयाविरोधात लढा देणार आहेत. हा निर्णय मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक आणि महापालिका प्रशासनाला पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अन्यथा १५ जानेवारीपासून सकाळी ८ वाजल्यापासून सामूहिक रजेवर जाणार असल्याचे पालिकेच्या मार्ड सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रवीण ढगे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in