

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगरमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आरक्षित उद्यानाच्या अतिरिक्त ३०५ चौ.मी. जागेचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावरून सुधार समितीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
सर्व्हे क्रमांक ३६३ मधील या जागेवर म्हाडाकडून पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये म्हाडाच्या आराखड्याला मंजुरी देताना दोन लगतच्या भूखंडांवरील उद्यानाचे आरक्षण प्लॉट आर-७ वर स्थलांतरित करण्यात आले होते. या स्थलांतरादरम्यान उद्यानासाठी आरक्षित क्षेत्र ६,३८१ चौरस मीटरवरून ६,६८६ चौरस मीटर इतके झाले. त्यामुळे अतिरिक्त ३०५ चौ.मी. क्षेत्र उद्यान आरक्षणात समाविष्ट झाले.
म्हाडाने महापालिकेला कळविले आहे की, प्लॉट आर-७/ए-५ वर कडसिद्धेश्वर महाराजांचे विद्यमान मंदिर असल्यामुळे संपूर्ण भूखंडाचा नियोजित विकास करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे स्थलांतर प्रक्रियेदरम्यान वाढलेले अतिरिक्त ३०५ चौ.मी. क्षेत्र उद्यानाचे आरक्षण वगळून ते लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी एप्रिल महिन्यात हा प्रस्ताव सुधार समितीपुढे ठेवण्यात आला होता. सुधार समितीने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) १९६६ च्या कलम ३७ अंतर्गत विकास आराखड्यात दुरुस्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.