
मुंबई : फसवणूकप्रकरणी वॉण्टेड असलेला पवन गोपीकृष्ण मोदी या आरोपीस ३३ वर्षांनी पुण्यातून पायधुनी पोलिसांनी अटक केली. मुंबईत चौकशीसाठी आणल्यानंतर पवनला माझगावच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१९९० साली पवनविरुद्ध पायधुनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो काही महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंट काढून विशेष सत्र न्यायालयाने त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी घोषित केले होते. त्याच्या अटकेसाठी पायधुनी पोलिसांनी विशेष मोहीम घेतली होती; मात्र तो गेल्या ३३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती काढत असताना पवन हा पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल वायर, पोलीस अंमलदार कैलास भोईटे, इरफान खान, दीपक निकम, शंकर राठोड, प्रकाश अलदर, नितेश घोडे यांनी पुण्यातील मुंडवा परिसरातून साध्या वेशात पाळत ठेवून पवन मोदीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला माझगाव येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.