आश्रय योजनेतील नवीन घरे बांधण्याचा मार्ग मोकळा ;परळ गौतम नगर येथील ३१ बांधकामे जमीनदोस्त

पालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार आणि एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आश्रय योजनेतील नवीन घरे बांधण्याचा मार्ग मोकळा ;परळ गौतम नगर येथील ३१ बांधकामे जमीनदोस्त

मुंबई : आश्रय योजना प्रकल्पात अडथळा ठरणारी परळ गौतम नगर येथील ३१ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पालिकेच्या एफ दक्षिण विभागाने केलेल्या कारवाईमुळे आश्रय योजनेंतर्गत नवीन घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ३१ प्रकल्प बाधितांना पर्यायी जागा रेट अथवा मोबदला यापैकी एक मिळणार असून, हे तीन पर्याय त्यांना सूचवण्यात आल्याचे एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांनी सांगितले.

परळ गौतम नगर येथे आश्रय आवास योजनेअंतर्गत नवीन घरे बांधण्याच्या प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मात्र याठिकाणी ३१ बांधकामे असल्याने अनेक वर्षांपासून कारवाई करणे शक्य होत नव्हते. परंतु एफ दक्षिण विभागामार्फत झालेल्या कारवाईमुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. परिणामी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत घरे प्राप्त होवून निवारा उपलब्ध होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार आणि एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एफ दक्षिण विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून तब्बल १३० मनुष्यबळ आणि त्यांच्या मदतीला ३ जेसीबी, २ डंपर, २ वाहने यांच्या सहाय्याने ही कारवाई तडीस गेली. तर पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी मिळून ९५ जणांचे मनुष्यबळ या कारवाई प्रसंगी बंदोबस्त स्वरूपात तैनात होते.

logo
marathi.freepressjournal.in