अखेर हक्काचे घर मिळणार, सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

या इमारती १९५८ ते १९६२ पासून अस्तित्वात होत्या. या इमारती मुंबई महानगरपालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या, त्यामुळे...
अखेर हक्काचे घर मिळणार, सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी/मुंबई

सायन कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या इमारतींचा पुनर्विकास करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे येथील १२०० कुटुंबियांना हक्काचे घर मिळणार आहे. वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी गुरु तेग बहादूर नगर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे.

सायन कोळीवाडा येथे सिंधी निर्वासितांच्या वसाहती असून यामध्ये एकूण २५ इमारती होत्या. या इमारती १९५८ ते १९६२ पासून अस्तित्वात होत्या. या इमारती मुंबई महानगरपालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या, त्यामुळे या सर्व इमारती पाडून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास होऊन बाधीत रहिवाशांना स्वत:चे घर मिळणे, ही तेथील रहिवाशांची गरज होती. या ठिकाणी ४१ हजार ५०० चौ. मिटर क्षेत्रावर २५ इमारती व त्यात १२०० सदनिका होत्या. रहिवाशांनी व्यापलेल्या भूखंडाव्यतिरिक्त उर्वरीत भूखंडावर झोपड्या बांधून जागेवर कब्जा करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमिवर या सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हाडामार्फत होणार पुनर्विकास

वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी गुरु तेग बहादूर नगर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे. म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमून या जमिनीवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या पुनर्विकासासाठी प्रत्येक इमारतीतील किमान ५१ टक्के किंवा पुनर्वसन योजनेमधील एकूण भाडेकरु किंवा रहिवाशांच्या किमान ६० टक्के भाडेकरुंची सहमती आवश्यक आहे. या संदर्भात गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अधिक्षतेखाली उच्चाधिकार समिती हा प्रकल्प राबविण्यावर सनियंत्रण ठेवेल.

logo
marathi.freepressjournal.in