बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा; वाराणसीच्या धर्तीवर उद्यान

माहिती फलक, आकर्षक पथदिवे, वाराणसीतील विकास प्रकल्पाच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, विहार मार्ग इत्यादी बाबी देखील या प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत आहेत.
बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा; वाराणसीच्या धर्तीवर उद्यान
Published on

मुंबई : बाणगंगा परिसरात असलेली १२ बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून बांधकामांवर हातोडा चालवण्यात आल्याने येथील मोकळ्या झालेल्या जागेचा वापर अधिकाधिक नागरी सुविधा देण्यासाठी होणार आहे. तसेच बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच परिसरातील एक रस्ता 'भक्ती मार्ग' म्हणून विकसित करण्यात येणार असून वाराणसीच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

वाळकेश्वर परिसरातील जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलाव व सभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम हटवणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री तथा स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या तलाव परिसरातील बांधकामे हटवून तलावाचा पुरातत्त्व वारसा जपण्यासाठी कामे हाती घेण्याचे पालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार या जीर्णोद्धार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बाणगंगा परिसर जीर्णोद्धार कामांच्या निमित्ताने आवश्यक कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जीर्णोद्धार कामांमध्ये अडथळा ठरणारी आणि मागील कित्येक वर्षांपासून असलेली बांधकामे हटवताना महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या माध्यमातून संयुक्तपणे पुनर्वसनाची कार्यवाही करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मंजुरीनंतर बाणगंगा परिसरात राहणाऱ्या १२ कुटुंबांना नजीकच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच पर्याय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. नागरिकांकडूनही या पुनर्वसनासाठीचे संमतीपत्र मिळाले आहे, अशी माहिती डी विभागाने दिली आहे.

'डी' विभागातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. बाणगंगा तलाव परिसर जीर्णोद्धाराचाही समावेश आहे. हा प्रकल्प "विशेष प्राधान्य प्रकल्प" म्हणून घोषित करण्यात आला आहे. वारसा स्थळांच्या यादीत ‘श्रेणी-१’मध्ये समाविष्ट असणाऱ्या बाणगंगा परिसराला जीर्णोद्धार कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन व आकर्षक रूप लाभणार आहे. उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे यांच्या निर्देशाखाली व सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या देखरेखीखाली डी विभाग कार्यालयाच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

सीसीटीव्ही, माहिती फलक, पुरातन वास्तूंचे जतन!

माहिती फलक, आकर्षक पथदिवे, वाराणसीतील विकास प्रकल्पाच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, विहार मार्ग इत्यादी बाबी देखील या प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलाव आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. तलाव परिसरातील पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. सदर कामे ही पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग संचालनालय यांच्या मार्गदर्शनानुसार व मुंबई वारसा संवर्धन समिती यांच्याशी समन्वय साधून करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी पुरातन वास्तुतज्ज्ञ विकास दिलावरी हे सल्लागार आहेत. तसेच गौड सारस्वत ब्राह्मण ट्रस्टचे देखील या प्रकल्पाला सहकार्य लाभते आहे, अशी माहिती 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in