कांदा निर्यात बंदीविरोधात पवार उतरणार मैदानात ;चांदवड येथील आंदोलनात नोंदविणार सहभाग

अवकाळी पावसामुळे आधीच कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्याचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातीवर बंदी घातली
कांदा निर्यात बंदीविरोधात पवार उतरणार मैदानात ;चांदवड येथील आंदोलनात नोंदविणार सहभाग

मुंबई : अवकाळी पावसामुळे आधीच कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्याचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातीवर बंदी घातली. अगोदरच दुधाला भाव मिळेना, त्यात उसापासून इथेनॉल निर्मितीलाही बंदी घातली. यावरून असंतोष वाढत असतानाच केंद्राने पुन्हा कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी संतप्त झाले असून, शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच आंदोलन सुरू केले. नाशिक जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या धरसोड वृत्तीविरोधात आता थेट माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेच मैदानात उतरणार असून, सोमवारी चांदवड (जि. नाशिक) येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. कांदा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यात दुधाचे दरही पडलेले आहेत. यावरून शेतकऱ्यांमध्ये आधीच असंतोष वाढलेला असताना केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर बंदी घातली. तत्पूर्वी उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदी घातल्याचे केंद्राने सांगितले. ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत घातली गेल्याचे शुक्रवारीच सांगण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. तसेच कांदा लिलावही बंद करण्यात येत आहे. त्यामुळे कांदाप्रश्न पेटण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आंदोलन सुरू आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शरद पवार सोमवारी चांदवड येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे कांदा आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

११ डिसेंबरला एल्गार

विविध प्रश्नांसाठी ११ डिसेंबर रोजी चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून, मुंबई-आग्रा रोडवर चांदवड चौफुली येथे शेतकरी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात खुद्द शरद पवार सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in