कलेक्टरच्या जमीनीवर पे अँड पार्क,अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येणार

आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मोकळा भूखंड मिळेल तिकडे अनधिकृत बांधकाम केले जात आहे
 कलेक्टरच्या जमीनीवर पे अँड पार्क,अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येणार
Published on

मुंबई उपनगरात कलेक्टरच्या जागा असून त्या जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आता त्या जमीनीवर पे अँड पार्क, अर्बन फॉरेस्ट व खेळासाठी मैदाने तयार करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेला तसा प्रस्ताव दिला असून पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केला.

आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मोकळा भूखंड मिळेल तिकडे अनधिकृत बांधकाम केले जात आहे. मुंबई उपनगरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जमीनी आहेत. या जमीनींवर अतिक्रमण झाले असून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीनीवर पे अँड पार्क, अर्बन फॉरेस्ट, जॉगिंग ट्रॅक, मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करुन द्यावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. पालिकेच्या मंजुरीनंतर या जमीनी विकसीत करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे ही निधी चौधरी म्हणाल्या.

मुंबईत मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो. मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध झाल्यास मुलांना खेळाची आवड निर्माण होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीनी विकसीत करण्याबाबत पालिका प्रशासनाला प्रस्ताव दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in