सात दिवसांत ३२६ कोटींचा मालमत्ता कर भरा! दंडात्मक कारवाईला सामोरे जा; पालिकेचा इशारा

मुंबई मेट्रो रेलच्या पाच कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेचे मालमत्ता करापोटी तब्बल ३२६ कोटी थकवले आहेत...
सात दिवसांत ३२६ कोटींचा मालमत्ता कर भरा! दंडात्मक कारवाईला सामोरे जा; पालिकेचा इशारा

मुंबई : मुंबई मेट्रो रेलच्या पाच कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेचे मालमत्ता करापोटी तब्बल ३२६ कोटी थकवले आहेत. वारंवार नोटीस देऊन ही दुर्लक्ष करणाऱ्या मेट्रो रेलच्या पाच कंत्राटदारांना अखेर नोटीस बजावत ७ दिवसांत थकीत रक्कम भरा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम मुदत २५ मे २०२४ ही आहे. मालमत्ताधारकांनी या मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई महानगरामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-१, मेसर्स एचसीसी-एमएमएस-२ या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रक तळ, भूकर क्रमांक ८ टप्पा २ आणि ३ याठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २०३ नुसार, १६ मार्च २०२४ रोजी संबंधित कंत्राटदारांना २१ दिवसांच्या आत करभरणा करण्याची नोटीस जारी करण्यात आली. ही २१ दिवसांची देय मुदत दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात आली. या २१ दिवसांच्या कालावधीतही त्यांनी करभरणा न केल्याने आता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा यांना १५ एप्रिल २०२४ रोजी तसेच मेसर्स एचसीसी-एमएमएस-१ आणि २ यांना १६ एप्रिल २०२४ रोजी सात दिवसांची अंतिम देय मुदत नोटीस जारी करण्यात आली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यास त्यांच्यावर मालमत्तेची अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१०-११ पासून मालमत्ता कर थकीत

एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमध्ये झालेल्या करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. या पाचही कंत्राटदारांकडे मिळून ३२६ कोटी २२ लाख ६९ हजार ८४६ रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून अद्यापपर्यंत करभरणा केलेला नाही. तर, एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे आर्थिक वर्ष २०१०-११ पासून मालमत्ता कर थकीत आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे संबंधित मालमत्ता कर थकबाकीदार कंत्राटदार

मेसर्स एचसीसी-एमएमएस

८६ कोटी ८४ लाख ०५ हजार ६९३ रुपये

मेसर्स सीईसी-आयटीडी

८४ कोटी ४० लाख ८३ हजार ७७ रुपये

मेसर्स डोगस सोमा

८३ कोटी २३ लाख ६७ हजार ४०५ रुपये

मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही

७० कोटी ५० लाख ४१ हजार ९०६ रुपये

मेसर्स एचसीसी-एमएमएस

०१ कोटी २३ लाख ७१ हजार ७६५ रुपये

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in