अंतिम मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरा; BMC चे आवाहन

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मालमत्ता कर भरण्याकरिता मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय तसेच सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्र कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
अंतिम मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरा; BMC चे आवाहन
Published on

मुंबई : आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मालमत्ता कर भरण्याकरिता मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय तसेच सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्र कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत आणि मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत. कर भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी मुंबई पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी शनिवारी देखील प्रशासकीय विभाग, कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत.

असा झाला कर भरणा

विद्यमान आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ पासून २६ डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण कर संकलन ५ हजार २४३ कोटी १६ लाख रुपये इतके करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्ष (२०२३-२४) मधील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही २५ मे २०२४ पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे १ हजार ६६० कोटी रुपये रक्कम देखील यात समाविष्ट आहे. याचाच अर्थ विद्यमान आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) कर संकलन हे ३ हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये इतके झाले आहे. विद्यमान आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट्य हे सुमारे ६ हजार २०० कोटी रुपये इतके आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५८ टक्के कर संकलन झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in