

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून नालासोपारा व विरार शहरांना जोडणाऱ्या पेल्हार-नालासोपारा आणि विरार फाटा-विरार शहर या दोन मुख्य रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी भाजपचे आमदार राजन नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. या रस्त्यांसह काही महत्त्वाच्या रस्त्यांना व नियोजित रेल्वे उड्डाणपुलांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम पाहणी केली. पाहणी पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेतर्फे आजपासूनच हद्द निश्चितीचे काम सुरू झाले आहे.
पेल्हार ते नालासोपारा आणि विरार फाटा ते विरार शहर या मार्गांच्या कॉंक्रिटीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. यासोबत महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते आणि रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांच्या कामासाठी आमदार राजन नाईक यांनी राज्य सरकार व एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज आमदार राजन नाईक, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चेतन बेंडाळे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे, वसई-विरार महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचांगे, उपअभियंता सूर्यवंशी आदींसह पाहणी करण्यात आली. या दोन्ही मुख्य रस्त्यांबरोबरच रिंग रूटचा काही भाग नालासोपारा पश्चिम पोलीस ठाणेलगतच्या रस्त्याद्वारे वसई स्टेशन सनसिटीला जोडणारा मार्ग तसेच नारंगी उड्डाणपूल ते आगाशी या नियोजित रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. यासंदर्भात महानगरपालिकेला त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
यासोबतच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या जागांची विराटनगर आणि ओसवालनगरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. सध्या महामार्गावरून नालासोपारा किंवा विरार शहरात येण्यासाठी पाऊण ते एक तास लागतो. विशेषतः पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. या समस्येच्या पार्श्वभूमीवर महामार्गाचे कॉंक्रिटीकरण केले जाणार असून कामाची प्रक्रिया एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झाली असल्याची माहिती आमदार राजन नाईक यांनी दिली.
आचोळे-दिवाणमानच्या विकासाचा मार्ग मोकळा
वसई-विरार महापालिका हद्दीतील आचोळे आणि दिवाणमान परिसरात अंदाजे १५०० एकर सरकारी जमीन उपलब्ध आहे. या परिसराचा बीकेसीच्या धर्तीवर विकास करून स्थानिकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली होती. या अनुषंगाने एमएमआरडीएने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून, आजच्या पाहणीदरम्यान या परिसराचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजन नाईक, एमएमआरडीए अधिकारी, मनपा अधिकारी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.