मंडप उभारताना खड्डे पाडल्यास दंड भरावा लागणार

निर्बंधमुक्तीमुळे कोविडनंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत गणेशोत्सवप्रमाणे धूमधडाक्यात साजरा करण्यात आला
मंडप उभारताना खड्डे पाडल्यास दंड भरावा लागणार

यंदाचा गणेशोत्सव उत्साहात पार पडला; मात्र रस्ते आणि पदपथांना खड्डे केल्याप्रकरणी पालिकेच्या ई-विभागाकडून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला सुमारे साडेतीन लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे पालिकेने नवरात्रोत्सवात मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे पाडू नये. तसेच मंडपाच्या अवती-भवतीही रस्ते आणि पदपथावर खड्डे पडणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मंडप तपासणीच्या वेळी रस्ता वा पदपथावर खड्डा आढळून आल्यास प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपये दंड त्या नवरात्रोत्सव मंडळाला भरावा लागेल, असा इशारा मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे.

निर्बंधमुक्तीमुळे कोविडनंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत गणेशोत्सवप्रमाणे धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यानंतर काही तासांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठीही जोरदार तयारी सुरू झाली. गेल्या काही वर्षांत मुंबई शहर व उपनगरातील नवरात्र उत्सव मंडळाची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरातील मैदान रस्ते व अन्य सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवीचे मंडप दिसून येतात. याच मंडप उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलेले आहे; मात्र हे मंडप उभारताना अनेक मंडळ सार्वजनिक ठिकाणी उदाहरणार्थ रस्त्यावर मंडपाचा बांबू रोवण्यासाठी खड्डा करतात. या खड्डे करण्यावर महापालिकेने पूर्णपणे बंदी घातली आहे.

गणेशोत्सवात रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे लालबागच्या राजा मंडळाकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. नवरात्र उत्सवातही मंडपाची पाहणी करताना रस्त्यावर खड्डे दिसून आले, तर प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे पालिकेकडून मंडळांना सांगण्यात आले आहे. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in