'पेंग्विन'चे पर्यटकांना आकर्षण, उत्पन्नात १५ पटीने वाढ; २० महिन्यांत १९.५६ कोटींचा महसूल

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात देशविदेशातील पर्यटक भेट देतात.
'पेंग्विन'चे  पर्यटकांना आकर्षण, उत्पन्नात १५ पटीने वाढ; २० महिन्यांत १९.५६ कोटींचा महसूल

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय २०१७ मध्ये पेंग्विन दाखल झाले. त्यानंतर बच्चेकंपनीसह मोठ्यांचे आकर्षण ठरलेले पेंग्विनमुळे राणी बागेच्या महसुलात १५ पटीने वाढ झाली आहे. २०१७ मध्ये वर्षभरात १४ लाख पर्यटकांनी भेट दिली आणि ७४ लाखांचा महसूल जमा झाला, तर १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या २० महिन्यांत २८ लाख ५९ हजार १६ पर्यटकांनी पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली आणि पालिकेच्या तिजोरीत ११ कोटी १५ लाख ३ हजार ७७६ रुपये उत्पन्न मिळाले. तर १ एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२३ पर्यंत २१ लाख ६५ हजार ९०६ पर्यटकांनी भेट दिल्याने ८ कोटी ४१ लाख ३६ हजार १९२ रुपये तिजोरीत जमा झाले. एकूण २० महिन्यात १९ कोटी ५६ लाख ३९ हजार ९६८ रुपये महसूल मिळाल्याचे राणी बाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात देशविदेशातील पर्यटक भेट देतात. लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत सगळेच राणी बागेतील शक्ती, करिश्मासह अन्य पशुपक्ष्यांची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी येत असतात. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी नवे प्राणी-पक्षी आणले गेल्याने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज पाच ते सहा हजार, तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार असणारी पर्यटकांची संख्या आता तीस हजारांवर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता तीस लाखांपर्यंत गेले आहे.

तिकिटाचे दर परवडणारे!

या उद्यानात प्रवेशासाठी प्रति व्यक्ती रुपये ५० रुपये इतके शुल्क असून ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते, तर आई-वडील आणि १५ वर्षांपर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तींच्या कुटुंबासाठी १०० रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

असे’ वाढले उत्पन्न

१ एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत या कालावधीत १३ लाख ८० हजार २७१ पर्यटक आले. त्यामुळे ७३ लाख ६५ हजार ४६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

१ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २८ लाख ५९ लाख १६ पर्यटक आले. यामुळे उद्यानाला ११ कोटी १५ लाख ३ हजार ७७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

१ एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ पर्यंत २१ लाख ६५ हजार ९०६ पर्यटक आले असून या कालावधीत उद्यानाला ८ कोटी ४१ लाख ३६ हजार १९२ रुपये उत्पन्न मिळाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in