भूमिगत कचरा पेट्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा

भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी
भूमिगत कचरा पेट्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा

मुंबई : कचरामुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई महापालिकेने भूमिगत कचरा पेटी बसवण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालयात भूमिगत कचरापेटी बसवण्यात आल्या आहेत; मात्र काही ठिकाणी बसवण्यात आलेल्या भूमिगत कचरा पेट्यांकडे दुर्लक्ष केल्याने अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे भूमिगत कचरा पेट्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा, अशी मागणी भाजपने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

उघड्यावरील कचरा पेट्यांपासून येणारी दुर्गंधी, मोकाट जनावरे याबाबत उपाय म्हणून शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या कचरा पेट्यांच्या उपयुक्ततेकडे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी लक्ष वेधले आहे. ''भूमिगत कचरा पेट्या काही प्रमाणात उपयोगी ठरल्या आहेत. कुलाबा येथे लायन गेट येथेही भूमिगत कचरा पेटी बसविण्यात आली आहे; मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे आढळून येत आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी यासारख्या समस्या तशाच असल्याचे दिसून येते. जनतेच्या पैशामधून हे बसविण्यात आल्याने त्याचा मुंबईकरांच्या फायद्यासाठी उचित वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे, सर्व भूमिगत पेट्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करून त्याचा उद्देश किती सफल झाला आहे ते पाहणे गरजेचे आहे," असे नार्वेकर म्हणले.

logo
marathi.freepressjournal.in