पेट्रोल दुचाकी इलेक्ट्रिक होणार

मुंबईतील स्टार्टअप ‘गोगोए१’चा उपक्रम; १५१ किमी ॲॅव्हरेजचा दावा
पेट्रोल दुचाकी इलेक्ट्रिक होणार

मुंबई : पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरच्या वर गेल्याने दुचाकी चालकांना मोठी पदरमोड करावी लागत आहे. ११० रुपये लिटरचे पेट्रोल भरल्यानंतर दुचाकी ३५ ते ४५ किमी चालतात. त्यामुळे अनेकांना ती परवडत नाही. त्यातच सध्या इलेक्ट्रिक दुचाकीची क्रेझ आहे. नवनवीन इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात येत आहेत. नवीन इलेक्ट्रिक दुचाकी घ्यायला गेल्यास सव्वा लाख रुपये मोजावे लागतात, मात्र तुमच्याकडील पेट्रोलची दुचाकी इलेक्ट्रिक करण्याची सोय मुंबईतील स्टार्टअप ‘गोगोए१’ या कंपनीने केली आहे.

या कंपनीने पेट्रोल दुचाकीला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘रेट्रोफिटमेंट’ किट आणले आहे. हे किट लावल्यावर एकदा रिचार्ज केल्यावर दुचाकी १५१ किमीपर्यंत धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. या किटला आरटीओने मान्यता दिली असून, हे किट ५० हून जास्त दुचाकीमध्ये बसवता येऊ शकते. यात हीरो मोटोकॉर्पच्या व होंडा मोटारसायकल व स्कूटर इंडियाच्या ४५ ब्रँड‌्स‌चा समावेश आहे. होंडा ॲॅक्टिव्हाच्या ५ प्रकारांना इलेक्ट्रिकमध्ये बदलले जाऊ शकते.

कंपनीने सांगितले की, पेट्रोल-डिझेलच्या अनेक गाड्यांना पर्यावरणपूरक इलेक्ट्रिकमध्ये बदलले आहे. कंपनीचे संस्थापक श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, या ईव्ही कन्वर्जन किटची महत्त्वाची बाब म्हणजे ती कोणत्याही दुचाकीत फिट बसते. त्यासोबत दीर्घकाळ चालणारी बॅटरी व बसवण्याची सहजसोपी पद्धत आहे. कंपनीकडे ५० हून अधिक पेटंट डिझाइन आहेत. येत्या काळात ते बाजारात आणले जातील.

भारतात २२ कोटी दुचाकी आहेत. केवळ १८ ते २० टक्के दुचाकी व्यावसायिक कामासाठी वापरल्या जातात. सध्याच्या सरकारी धोरणानुसार सर्व व्यावसायिक वापराच्या दुचाकी २०२७ पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचे सरकारने सांगितले आहे. ४० टक्के दुचाकी इलेक्ट्रिकमध्ये परिवर्तीत होऊ शकतात, असा आमचा अंदाज आहे. याचाच अर्थ १.६ कोटी वाहनांचे रूपांतर इलेक्ट्रिकमध्ये होऊ शकते. दुचाकी इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याच्या कामात लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. ‘गोगाए१’ कंपनीने दिल्ली सरकारशी करार केला आहे. या करारांतर्गत १५ वर्षांच्या जुन्या गाड्यांचे रूपांतर इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये केले जाईल.

ॲॅक्टिव्हाच्या रूपांतराचा खर्च ६० हजार

कंपनीने रूपांतराचा खर्च जाहीर केला नाही. मात्र, कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, होंडा ॲॅक्टिव्हा इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करायला ६० हजार खर्च आहे. कंपनीचे किट १९ हजार, बॅटरीसाठी इनबिल्ट आयओटी ५ हजार, बॅटरी ३० हजार रुपये, चार्जर ६५०० रुपये लागतील.

logo
marathi.freepressjournal.in