फाळके पुरस्कार घोटाळ्याच्या चौकशीला स्थगिती; तक्रारदाराला न्यायालयाची नोटीस; ७ नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

अनिल मिश्रा व त्यांच्या मुलाने दादासाहेब फाळके यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फाळके पुरस्कार घोटाळ्याच्या चौकशीला स्थगिती; तक्रारदाराला न्यायालयाची नोटीस; ७ नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी
Published on

मुंबई : दादासाहेब फाळके पुरस्कार घोटाळ्याशी संबंधित गुन्ह्याची अधिक चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. माजी स्पाॅटबाॅय अनिल मिश्रा व त्यांच्या मुलाने गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने तक्रारदाराला नोटीस बजावली आणि पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

अनिल मिश्रा व त्यांच्या मुलाने दादासाहेब फाळके यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा रद्द करण्यासाठी मिश्रा पिता-पुत्राने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या नावाखाली पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात गैरव्यवहार करण्यात आल्याच्या आरोपावरून वांद्रे पोलिसांनी अनिल मिश्रा आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिश्रा पिता-पुत्राने हा कार्यक्रम सरकार-प्रायोजित पुरस्कार सोहळा म्हणून खोटे चित्र उभे केले आणि चित्रपट कलाकारांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. तसेच महोत्सवाची विश्वासार्हता वाढविण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचे फोटो आणि बनावट पत्रे वापरल्याचाही गंभीर आरोप आहे.

याप्रकरणी भाजप फिल्म असोसिएशनचे राज्य अध्यक्ष समीर दीक्षित यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने तक्रारदार दीक्षित यांना मिश्रा पिता-पुत्राच्या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in