मुंबई : भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेचे (पीसीआय) निकष धाब्यावर बसविणाऱ्या राज्यातील औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या तब्बल १७६ संस्थांना तंत्र शिक्षण संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या संस्थांनी निकषांची पूर्तता न केल्यास चालू शैक्षणिक वर्षांचे प्रथम वर्षाच्या प्रवेशाला परवानगी देण्यात येऊ नये, अशा निर्देश तंत्र शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
राज्यात २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत परवानगी देण्यात आलेल्या राज्यातील संस्था भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेच्या निकषाप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात काय याची तपासणी करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या तपासणीमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या ९२ पैकी ४८ आणि पदविक अभ्यासक्रमाच्या २२० पैकी १२८ महाविद्यालये पात्रतेचे निकषच पूर्ण करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यामुळे या महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयाने ऑगस्ट महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या निकषांची केली नाही पूर्तता
अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच नसणे
भोगवटा प्रमाणपत्र नसणे
प्रयोगशाळांची संख्या कमी
पीसीआयच्या निकषांपेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे.