ठाकरे गटातील फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना; फोन टॅपिंग प्रकरणानंतर खबरदारी

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली माहिती, म्हणाले जाणीवपूर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप
ठाकरे गटातील फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना; फोन टॅपिंग प्रकरणानंतर खबरदारी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणानंतर आता ठाकरे गटातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. ठाकरे गटातील मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार, खासदार तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यकांसह सर्व स्टाफला फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, "सध्या घडीला ज्याप्रकारचे राजकारण सुरु आहे, त्यानुसार आपली सुरक्षा गरजेची आहे. म्हणून पक्षातील प्रत्येक प्रमुख व्यक्तींना आयफोन वापरण्याच्या सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. मात्र, जबाबदार लोकांनी जबाबदारीने राहिले आणि बोलले पाहिजे. कधीकधी चारचौघात असताना एखादा शब्द निघून जातो आणि त्यामुळे रेकॉर्डिंग होते व त्याचा मोठा मुद्दा बनवला जातो. अशामध्ये आपण काळजी घेणे गरजेचं आहे.

पुढे ते म्हणाले की, "मागच्या काळामध्ये फोन टॅपिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आताही हे सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. शिवसैनिकांना त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे या सरकारवर आमचा अजिबात विश्वास उरलेला नाही. यामुळे आम्ही खबरदारी बाळगण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. जाणीवपूर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in