
मुंबई : पुणे-दिल्ली फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी मुंबई विमानतळ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या अफवेमुळे शुक्रवारी मुंबई विमानतळावर या विमानाचे मात्र इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आकाश त्यागी नावाच्या प्रवाशाने एका प्रवाशाच्या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. पण, ही अफवा असल्याचे रात्री उशिरा उघडकीस आले. अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि विमानाच्या पायलटला मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
त्यानंतर संपूर्ण विमान रिकामे करण्यात आले आणि कसून तपासणी करण्यात आली. परंतु, विमानात कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर, विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यागी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत गरंडे यांनी सांगितले, ‘‘आरोपी हा मानसिक रुग्ण असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.’’